रेवा रेखाटताना…
– अंकिता अ. आ.
‘रेवा’ पहिल्यांदा भेटली ती Indian Ocean च्या ‘माँ रेवा थारो पानी निर्मल, कलकल बहतो जायो रे’ या गाण्यातून. नंतर भेटली ती नर्मदा बचाओ आंदोलनाच्या पदयात्रेत फिरताना ऐकलेल्या संघर्षाच्या नाज्यातून तिला ‘माँ’, ‘भैय्या’ म्हणणाऱ्या तिथल्या लोकांच्या बोलण्यातून त्यांनी सांगितलेल्या नर्मदेच्या गोष्टीतून खड्या आवाजात गायलेल्या लोकगीतांमधून आणि शेवटी प्रत्यक्ष भेटली दिसली. नर्मदा नदीला महाकवी कालिदासाने दिलेलं हे नाव, ‘रेवा’ या तीनही ‘रेवा’चं रूप खूप वेगवेगळं होतं. गाण्यातली ‘रेवा’ खळखळती, अल्लड होती. लोकांच्या मनातली ‘रेवा’ वत्सल, प्रेमळ होती, आईसारखीच. आणि याउलट प्रत्यक्ष भेटलेली ‘रेवा’ मात्र वेगळीच होती. बांधलेली. जखडलेली. अथांग होती, नजरेच्या पलीकडची, पण ते पाणी वाहतं नव्हतं, जिवंत नव्हतं, साचवलेलं होतं. सरदार सरोवर धरणाच्या जलाशयात साठवलेली रेवा होती ती. आत्तापर्यंत धरण, त्यामुळे झालेलं विस्थापन दर पावसाळ्यात पाणी वाढल्यामुळे येणारं बुडीत, यापूर्वी बुडालेली आणि आताही बुडितात असलेली घरं, गावं, या अन्यायाविरुध्दचा गेल्या एकतीस वर्षांचा संघर्ष, तिच्याशी असलेलं तिथल्या लोकांच नातं हे सगळं मी अनुभवत होते. पण ‘रेवा’च्या या प्रत्यक्ष भेटीने मात्र हलवून सोडलं.. धरण, विस्थापन, पुनर्वसन, न्याय-अन्याय या सगळयाच्या पलीकडे जाऊन त्या नदीशीच एक वेगळं नातं तयार झालं स्वतःच्याही नकळत. वाटलं की या साचलेल्या पाण्यात या नदीमाईच्या मनातलं काय काय दडलेलं असेल? आत खोल… तिला अडवणाऱ्या त्या धरणाबद्दल राग, तिरस्कार, स्वतःचं घर, शेत, गाव सगळंच गमावणाऱ्या आणि तरीही तितक्याच प्रेमाने तिला नर्मदामैय्या म्हणणाऱ्या तिच्याकाठच्या लोकांबद्दल प्रेम, माया, अपराधीपणाची भावना, काय आणि किती…..
मनाच्या या सगळया घुसळणीतून ‘नर्मदाई’ ही ओवीवजा कविता मी लिहिली. नर्मदाई है नर्मदा बचाओ आंदोलनाने मणिबेली या गावी केलेल्या पहिल्या सत्याग्रहाच्या झोपडीला दिलेलं नाव. याच नर्मदाई कवितेने आणि माझा मित्र आणि रेवाचा दिग्दर्शक वैभव लोकुर याने दिलेल्या प्रोत्साहनाने एक पूर्ण वेगळं विश्व माझ्यासमोर खुलं केलं, नाटकाचं, सोलो थिएटरची लहानपणी फक्त हौस म्हणून केलेली बालनाटयं सोडता माझा नाटकाशी संबंध फक्त प्रेक्षक म्हणूनच होता. फक्त या माध्यमाच्या प्रचंड ताकदीचा थोडासा अंदाज असल्यामुळे रेवा आणि तिच्या अनुषंगाने समोर येणारं जळजळीत वास्तव, बोचरे प्रश्न वेगळया पध्दतीने मांडण्याची ही एक संधी आहे हे जाणवलं होतं. मग सुरुवात झाली ती लिखाणाला. एखाद्या नाटकाची संहिता लिहिण्याची ही पहिलीच वेळ. माझा लिखाणाचा पिंड ललित लेखनाचा. संथ, विस्तारित तो मोडून काढून जलद आणि नाट्यमय लिहिणं हे एकप्रकारे पहिलं आव्हान होतं. रेवा या व्यक्तिरेखेचा आमचा शोध फक्त आतच नाही, तर बाहेरही चालू होता. नर्मदा बचाओ आंदोलनात मला भेटलेल्या रेवाच्या असंख्य रूपांनी आमची रेवा उभी केली. मेधाताई, योगिनीताई, लतिका, रेवतीताई आमच्या कमळू जीजी, शन्नो भाभी, श्यामा चाची यांच्यापैकी प्रत्येकीची रेवा माझ्यासाठी वेगळीच होती आणि तितकीच लोभस होती. नर्मदा नदीला मित्र, सोबती यापेक्षाही भक्त, परिक्रमावासी यांचा विळखा जास्त, त्यामुळे तिचे अध्यात्मिक आयाम विसरूनही चालणार नव्हतं. तिचं झालेलं गलिच्छ, भपकं आणि ओंगळ दैवतीकरण आणि आजची तिची दयनीय अवस्था यातला टोकाचा विरोधाभास प्रचंड अंगावर येणारा, अस्वस्थ करणारा आहे, ज्याचा संहितेत समावेश करताना त्याबद्दल वाचणंही जीवावर यायचं. या सगळयावरच्या ‘आमच्या सततच्या चर्चामधून वादांमधून रेवा एक व्यक्ती म्हणून जी उभी राहिली ती माझ्या स्वभावाच्या पूर्ण विरुध्द ! मी जितकी शांत, बचावात्मक तितकी ही आम्हीच शोधलेली रेवा बंडखोर, आक्रमक. त्यामुळे लिहितानाही अंकिताला दूर लोटून रेवा म्हणूनच लिहिणं ही एक नवी कसरत होती, जी साधायलाही बराच वेळ लागला. जिथे माझी आक्रमकता बाहेर काढून काढून संपून जायची तिथे मुळी देवाचं बंड सुरु व्हायचं आणि कुठल्याकुठे वर पोहोचायचं! तिच्या या बंडाचा शेवट काय असावा यावरही बरेच वाद झाले. हे सगळं कागदावरती उतरवून काढण्याची प्रक्रिया प्रचंड थकवणारी होती. पण अखेर हे साधलं आणि संहिता पूर्ण झाली. जरासं हुश्श म्हणेपर्यंत सुरू झाला नवा संघर्ष रेवा रंगमंचावर उभी करण्याचा.
या प्रवासाचा सगळयात पहिला आणि मला सगळ्यात कठीण गेलेला टप्पा म्हणजे रेवाला स्वतःवर लादून घेणं, त्या भूमिकेत घुसून उभं राहणं. एरवी नर्मदा हा माझा मोठाच वीक पॉईट आहे. पण तालमीला उभं राहिल्यावर आपण हे नाटक म्हणून सादर करतोय या आत कुठेतरी असलेल्या जाणिवेमुळे ते फारच कृत्रिम होऊन जायचं. भावनाशून्य, यांत्रिक वाटायचं याचा खूप सही व्हायचा. पण वैभवने सांगितल्याप्रमाणे हळूहळू ते जमत गेलं. दुसरी अडचण नाचाची. मला नाचण्याची भीतीच वाटते, पण इथे मी नाचणं हे अत्यावश्यकच होतं. त्यामुळे मग स्वतःच्या भीतीवर सावकाशीने मात करत करत मी कशीही का होईना, पण नाचायला लागले. नाचता नाचता गायला लागले. संहितेची गरज असलेली नर्मदेच्या खोऱ्यातली लोकगीतं, लोककथा तिथल्या सार्थीकडून मिळवणं, त्यांचा अर्थ, बाज समजून घेणं आणि त्याप्रकारे त्या सादर करणं हेही साधलं. यात राहुल, रोहित, शुभम, पवन या नर्मदेतल्या युवा साथींनी खूपच मदत केली. विजय भाऊंनी अक्षरश: फोनवर शिकवलेल्या आदिवासी गाण्याने तर वैभवपासून ते आमच्या रेकॉर्डस्टपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं! हळूहळू गोष्टी जमत गेल्या. नाटकाचा शेवटचा भाग करताना सुरुवातीला ठरवून डोळयात पाणी आणावं लागायचं. पण त्या भूमिकेत एकदा घुसायला शिकल्यावर ते आपोआप यायला लागलं, तो आवेश, आवेग, ती आक्रमकता इतकी भिनायला लागली की तालीम संपल्यानंतर मूळपदावर यायला मला वेळ लागायचा, अजूनही लागतो. आणि या सगळ्यातून अखेर रेवा उभी राहिली, Expression Lab च्या Solo Theatre 2016 मध्ये उतरली, ‘सर्वोत्कृष्ट संहिता’ आणि ‘सर्वोत्कृष्ट एकल नाटय असे दोन पुरस्कार तिला मिळाले. सध्या सुरू आहे ती प्रयोग लावण्याची यशस्वीरीत्या पार ‘पाडण्याची आणि देवाची ही कहाणी शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण टीमची धडपड.
‘रेवा’ ही मूलतः जरी एका नदीची कथा, किंबहुना व्यथा असली तरी ‘देवा’चा परिघ हा खूप मोठा आहे. ‘देवा’ ही कुणी बाहेरची तिन्हाईत व्यक्ती नाहीच मुळी. ‘देवा’ ही आपली प्रत्येकाची आहे, प्रत्येकात आहे. ‘रेवा’ हा एक प्रवास आहे. स्वतःला शोधण्याचा. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, किंबहुना कसल्याही विरोधाला, अडथळयाला न जुमानता ती समोरच्यांच्या मनावर ठसवण्याचा. म्हणूनच ‘रेवा’ बघणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी जरी तिने अस्वस्थ केलं, अंतर्मुख केलं. स्वतःच्याच आत ‘रेवा’ला शोधायला उद्युक्त केलं तर हेच ‘रेवा’चं सगळ्यात मोठं यश आहे असं मी मानते.
‘रेवा’ अनुभवण्यासाठी मला बोलवा!
नर्मदाई माय माझी,
पाणी वाहे खळाखळा,
पाहीपाहीन म्हणता
जागी ठरेना गं डोळा.
तिची काय सांगू बात?
पोर इवली इवली,
बापालागी देण्या पाणी
थेट देवाला बोलली,
‘अरे कसली मी लेक?
पाणी बाबांना देईना,
कर कर मला नदी,
सुखी करीन लाखांना!’
नर्मदी ‘नर्मदा’ झाली,
तिचं केवढं गं पात्र?
गोड पाणी देवोनिया
तृप्त करी दिनरात्र.
गाळ आणि वाहून,
पसरे गं तीरावरी,
मोठी सुपीक जमीन,
तिचा आशीर्वाद शिरी!
आला आला गं सैतान,
कैद करी नर्मदेला,
बांध बांधोनी बांधोनी
प्रवाह गं अडविला.
रागे रागे नर्मदाई
घेई विक्राळ ते रूप,
शिरे घराघरांमधी,
आम्हांवरी झाला कोप.
गेले शेत, गेले घर,
झाली सामसूम वाडी,
ऐसा कैसा गं ‘सरदार’?
माय-लेकरांना तोडी.
अरे सैताना, सैताना,
काय अडविशी पाणी?
तुझ्या मनाला कळेना
मुक्या नर्मदेची वाणी.
नर्मदाई, काय सांगू
तिच्या अंतरीच्या कळा,
तोडूतोडून तो बांध
व्हावा प्रवाह मोकळा!
झाली झाली एकजूट
लेकर गं नर्मदेची,
राखी बांधिली, बांधिली
नर्मदेच्या रक्षणाची.
झाली तीन गं दशकं,
लटा गेला जगभर,
माई नर्मदाईसाठी
तिच्या तान्ह्यांचा जागर