हिन्दी में पढिएँ | Read in English
जीवनशाळा – घराबाहेरच्या जगात पहिली पावले
१९८५-८६ चा काळ. सरदार सरोवर या विनाशकारी प्रकल्पाच्या विरुद्ध नर्मदा नदीकाठी, मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली सुरूझालेले सत्याग्रह आदिवासी त्यांच्या मुलांसह मीटिंग आणि सत्याग्रहाला येत असत. काही कार्यकर्ते त्या मुलांना रमवत असत. त्यातल्याच एकाने एक दिवस झाडाला एक फळा टांगला, खडूने त्यावर लिहायला सुरु केली… आणि सुरु झाली जीवनशाळा!
पहिल्या जीवनशाळा नर्मदेच्या काठावर चिमलखेडी आणि निमगव्हाण येथे। १९९१ मध्ये सुरु झाल्या. (आता ही दोन्ही गावे सरदार सरोवर धरण आणि त्याच्या जलाशयाखाली गेली आहेत.)
जगण्याला आवश्यक अशा कला, सभोवतालच्या निसर्गाशी संवाद आणि त्याला जोडलेला शाळेचा नेहमीचा अभ्यासक्रम ह्या सर्व गोष्टी समजावणाऱ्या शाळा आणि त्यासुद्धा अशा जागी जिथे शाळा कधीच अस्तित्वात नव्हती असलीच तर फक्त कागदावर… ह्याने प्रेरित होऊन आजूबाजूच्या गावांमध्येसुद्धा जीवनशाळेची मागणी होऊ लागली आणि जीवनशाळांची संख्या वाढू लागली.
सध्या महाराष्ट्रात ६ आणि मध्य प्रदेशात १ अशा ७ निवासी जीवनशाळा आहेत. इथे ६ ते १३ वयोगटातील ७०० ते ७५० विद्यार्थ्याना प्राथमिक शिक्षण दिले जाते. या शाळांमधून २६ शिक्षकांसह इतर २६ कर्मचारी काम करतात. विद्यार्थी संख्या थोडी कमी-जास्त होत राहते.
अशा आहेत जीवनशाळा!
- आत्तापर्यंत सुमारे ६००० विद्यार्थी जीवनशाळेतून शिक्षण घेऊन पास झाले आहेत. काही पुढे जाऊन पदवीधरसुद्धा झाले आहेत. ह्यातले बहुतेकजण पहिल्या पिढीतील शिक्षित आहेत आणि आता काहीजण विविध क्षेत्रात काम करत आहेत.
- जीवनशाळांमध्ये शासनाने आखून दिलेल्या अभ्यासक्रमाबरोबर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अशा इतर गोष्टीही समजावल्या जातात.
- संवाद साधण्याच्या दृष्टीने सोयीचे म्हणून शिक्षणाची सुरुवात आदिवासी मुलांच्या मातृभाषेतून होते. नंतर राज्याची भाषा शिकवली जाते. आणि पुढचे चौथीपर्यंतचे शिक्षण या दोन्ही भाषांमधून दिले जाते.
- सर्व शिक्षक (डी.एड. शिक्षित) हे आदिवासी समाजातले आहेत.
- जीवनशाळेत मुलांना सकाळी नाश्ता आणि दोन वेळचे जेवण (ज्यात मोड आलेले धान्य, उसळी यांचा समावेश असतो). सर्वांगीण विकासासाठी हस्तकला, गाणे, चित्रकला, जंगल ओळख, विविध खेळ, नृत्य इ. गोष्टींचा समावेश आहे.
- प्रत्येक गाव एक देखरेख समिती निवडते. त्यातील सभासद जीवनशाळेबद्दलचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात.
- धडगाव येथील आमच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या ‘शोभा वाघ मेमोरियल हॉस्टेल’मध्ये पाचवीच्या पुढचे शिक्षण घेणारे २५ ते ३० विद्यार्थी राहतात.
- इथे शिक्षण हे संस्कृती, नैसर्गिक पर्यावरणाचे वास्तव आणि विस्थापनासारखे सामाजिक प्रश्न यांच्याशी जोडलेले आहे. म्हणूनच जीवनशाळेचे बोधवाक्य ‘जीवनशाला की क्या है बात? लडाई पढाई साथ साथ’ हे आहे.
- वर्षातून एकदा दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालमेळा’ आयोजित केला जातो. ह्या चार दिवसांच्या मेळ्यात सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी भाग घेतात. गाणी, नृत्य, क्रीडा, नाटक यांच्याद्वारे बालमेळ्यामध्ये मुलांच्या आणि शिक्षकांच्या सृजनशीलतेला वाव दिला जातो.