हे पण भारताचे लोक

– शिल्पा बल्लाळ

सकाळी फोन वाजतो. ‘नर्मदा सियाराम भाऊ’ असं लिहून येतं. माहेरच्या माणसाचा फोन आल्याच्या आनंदात मी फोन उचलते. नेहमीचा प्रेमळ, आपुलकीचा पण थोडासा संकोच असलेला आवाज.

– ताई, जिंदाबाद !

– जिंदाबाद सियाराम भाऊ! कसे आहात ? बोला.. ताई, ते तुम्ही पाठवलं ना whats app वर, मुलांच्या हॉस्टेल चं…

– हो, आहेत का कोणी मुलं, पुण्यात शिकणारी ? त्यांची राहायची सोय करता येईल.

– ताई, माझ्याच मुलांना पाठवायचं आहे.

– अरे वा, करुयात की.

– आत्ता मुलगी सायन्सला आहे, तिला कॉलेजला पुण्यात घालायचं आहे ताई.

काथर्डे दिगर नर्मदा वसाहत. जीवन शाळांच्या बालमेळ्याला जायला पुण्यातल्या काही पाहुण्यांना घेऊन मी धरमसिंग-संगीताच्या घरी पोचलीय. पोचताच आमची सरबराई करत आहेत दोन चुणचुणीत मुली. पाणी दे, मग चहा दे, कप आत नेऊन ठेव, मग नाश्ता दे, आपापले कप, ताटल्या आत नेऊन ठेवायला उठलो की धावत येऊन त्या हातातून हळूच हसत ओढून घे. मग आम्ही त्यांच्याशी खोटं भांडण करणार, त्या ऐकणार नाहीत आणि फार जोरात विरोध न करता, फक्त हसत आपल्या हातातून ताटली काढून घेणार. थोडा वेळ गेल्यावर त्या आतून नुसत्याच डोकावतात. मी वळून बघते आणि ‘आम्ही हसतो.

– इकडे या गं मुलींनो.

– (त्या फक्त लाजतात)

– तुमची नावं काय? काय करता?

थोरली पुढे येते. चक्क हाताची घडी घालते.

– My name is Neha Dharamsing Vasave. I study in 10th class.

– (दुसरी, तशीच पुढे येऊन) My name is Arti Dharamsing Vasave. I study in 7th class.

– Very nice! पुढे काय शिकणार आहात अजून ? दोघी गप्प. संगीता बाई बाहेर येत.

– पुढे तर अजून शिकणारच ना ताई. आत्ता सुट्टीत आल्यात इथे, तिकडे हॉस्टेलला असतात.

जीवन नगर वसाहत. ओरसिंग गुरुजी- नीमाचं घर. अतिशय सुंदर आणि सादगीने ठेवलेलं. कुडाच्या भिंती, बाहेर गोठा, जमीन कोब्याची, बाहेर भाजीच्या अनेक वेली, शेजारच्या अंगणात मिरची, टोमॅटो, तुरीच्या शेंगा लागलेली छोटी छोटी रोपं. ओरसिंग गुरुजी आम्हाला चहाला घरी घेऊन जातात. ओसरीतच खुर्च्या टाकून आम्ही बसतो.

– निमा ताई कुठेय?

– फोन वर बोलतेय, आमच्या बरक्याचा फोन आलाय.

– कुठे गेलाय का ?

– तो हॉस्टेल ला असतो ताई.

– एवढा मोठा आहे? कितवीला आहे ?

– सहावीला

– जीवन शाळेचा विद्यार्थी आहे तो, माझ्या सारखा. ओरसिंग गुरुजी हसत, अभिमानानं सांगतात.

रविवार ची सकाळ, पुणे. आमच्या सोसायटीच्या whats app ग्रुप वर चर्चा सुरूये. एक फोटो टाकला आहे आणि त्या खाली हे मेसेज आहेत –

– ही बाइक आमच्या पार्किंग मध्ये काल पासून लावली आहे. हे आमचं पार्किग आहे. त्यात दुसऱ्या कुणीही त्यांची गाडी लावण्याची परवानगी नाही.

– वॉचमन काय करत होता? त्याला विचारलं का?

– तो म्हणाला त्याला नाही माहीत. आम्ही त्या बाइकची हवा सोडली आहे. आमच्या पार्किंगमध्ये कुणीही गाडी लावून जाईल हे चालणार नाही.

– पण तुमच्याकडे एकच कार आहे ना? पार्किंग दोन गाड्या मावतील इतकं आहे. सोसायटीकडून नावं पेंट होतील, तोवर आपण थोडं अॅडजस्ट करायला लागेल.

– माझ्याकडे एक गाडी आहे की दोन हा माझा प्रश्न आहे. Mind your own business. हा अन्याय आहे, आम्ही तो सहन करणार नाही.

बुधवार – दुपार – पुणे – कोथरूडचा चौक
एक वयस्क आजी आजोबा, रोज सकाळी फळांनी भरलेली हातगाडी ढकलत ह्या चौकात पोचतात. रोज. मी सकाळी सायकल चालवायला जाते तेव्हा दिसतात. चढ बराच आहे. सायकल वर पण मला चढता येत नाही, त्यावर ते सत्तरीचं जोडपं, रोज, हातगाडी ढकलून आणतात आणि संध्याकाळपर्यंत चौकाच्या कोपऱ्यात बसतात. मी आठवड्याला दोनदा त्यांच्याकडून फळं घेते.

– (माझ्याच वयाच्या एक काकू) जांभळं चांगली आहेत ना? मागच्या वेळची बरीच खराब निघाली.

– छान आहेत ताई, घ्या, रानचा मेवा आहे.

– करवंद कशी दिली?

– घ्या ताई… एकदम गोड हायेत, खाऊन बघा. चेरी पण आहे.

– चेरी कशी?

– ४०० ला बॉक्स

– ४००? काहीही सांगताय.. तेव्हढाच भाव आहे ताई, लई महाग झालेत फळं.

– आणि पेयर?

– ते १००?

– किलो?

– नाई हो, पाव.

– काहीच्या काही भाव आहेत हा तुमचे. नको. मी पुढे बघते.

काकू तरतरा निघून जातात आणि पुढच्या बाजूला उभ्या असलेल्या महागड्या कार मध्ये बसतात. ड्रायविंग करणाऱ्या नवऱ्याला ‘पुढे जाऊ’ म्हणतात आणि दार लावल्याचा आवाज येतो.

मध्यमवर्ग – धनदांडगे – पुँजीवाद – समता – समरसता – कल्याण योजना – सत्ता पिपासू – जुमला जीवी आंदोलन जीवी (?) – नक्राश्रू – दुटप्पी चारिर्त्य – संवेदनहीन लोकशाही – शहरीकरण आबाळ भ्रष्टाचार पर्यावरण – सेंद्रिय शेती – अन्याय – शेतकरी आंदोलन पुनर्वसन – बुडीतक्षेत्र- पुराचं पाणी नदी जोडो -सर्वात उंच – सगळ्यात मोठं… पहिला क्रमांक…..

पुण्याहून उत्तरेकडे, फक्त सव्वा पाचशे किलोमीटरवर •असलेल्या नर्मदा नदीच्या खोऱ्यात वसलेलं मणिबेली हे गाव. भारताच्या लोकसभा मतदार संघाच्या यादीत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर येतो महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा, त्यात पहिलं गाव आहे मणिबेली आणि त्यात राहतात भारताचे पहिल्या क्रमांकाचे मतदार – वरसन बिजा वसावे. ह्याच मणिबेली चा अजून एका बाबतीत पहिला क्रमांक येतो. अवाढव्य सरदार सरोवर प्रकल्पानं आपल्या वासलेल्या जबड्यात गिळंकृत केलेलं मणिबेली हे पहिलं गाव आहे. नर्मदा बचाओ आंदोलनाची सुरुवात ह्याच गावातून झाली. आज तिथेच एक जीवनशाळा आहे. शंभरच्या संख्येत विद्यार्थी. शाळा निवासी आहे. विद्यार्थी वय वर्षे ६ ते १०, शिक्षण पहिली ते चौथी.

मागच्या वर्षी, १४ ऑगस्टला आम्ही काही सामाजिक चळवळींशी संबंधित मित्र पुण्याहून मणिबेलीला पोचलो १५ ऑगस्टचा दिवस मणिबेलीमध्ये साजरा करायला. गाडी, मग चालत, मग नाव, पुन्हा चालत असा प्रवास करत पोचायला आम्हाला दुपार झाली. दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तिकडे खोऱ्यात खूप मोठं वादळ येतं आणि शाळेची छप्परं उडून जातात, म्हणून शासनानं एक पक्की योजना केली आहे. त्यांनी शाळांना टिनाचे शेड बांधून दिले, शाळा म्हणून!!! खाली ओली माती, फार सपाट न केलेली, भिंती टिनाच्या, छत पण टिनाचं. त्याच खोल्यांमध्ये वर्ग भरतात आणि त्यातच मुलं राहतात. म्हणूनच त्याला जीवनशाळा म्हणतात. जगभरात शिक्षण विचारात हेच म्हटलं जातं की जगणं आणि शिकणं एकत्र झालं पाहिजे. तेच जीवनशाळेचं ब्रीदवाक्य आहे –

जीवनशाला की क्या है बात
संघर्ष – निर्माण साथ साथ.
भारताच्या इतर कुठल्याही गावात गेलो की आधी दिसतात मुलं. नुसती उंडारणारी, मस्ती करणारी, अजूनही गाडी गेली की तिच्या मागे धावणारी. अनेक मुलं शाळेत जाणारी पण दिसतात, टाय लाऊन, बूट घालून, गणवेश धारी! पण नर्मदेची आदिवासी गावं सध्या वेगळीच दिसतात. आदिवासींच्या अंगी आधीच असलेला • शांतपणा अजून जास्त जाणवतो. गावातली मुलं कुठे आहेत ? नर्मदा बचाओ आंदोलनाशी जोडलेल्या गावांमधली मुलं जीवनशाळेत येतात. तिथंच राहतात, शिकतात. ह्याच जीवन शाळांमधून शिकून मोठे झालेले अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्राचं नाव काढताहेत, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात पदकं मिळवताहेत, बरेच जुने विद्यार्थी नर्मदेच्या गावांतच राहून कृषी समिती, मत्स्य पालन समिती चालवतात, पंचायत निवडणुका लढवतात, आपल्या पुढच्या पिढीला शिक्षणाच्या मार्गाला पाठवतात. ह्या जीवनशाळांमुळेच आदिवासींचं भारताचं नागरिकत्व दृष्य होतं, बाहेरच्या जगाला दिसतं…. ज्यांना बघायचं असतं त्यांना! मग तेच धरमसिंग, संगीता बाई, सियाराम, ओरसिंग, नीमा आपल्या घराला घरपण देणारी मुलं पुढच्या शिक्षणसाठी आश्रम शाळांमध्ये पाठवतात, त्यांच्या आयुष्याला भारतीयपण देण्यासाठी, कारण माणूसपण तर आदिवासी जन्मासोबत घेऊनच आले असतात. (ह्या विषयी पूर्वी मी बरंच लिहिलं आहे. माहितीपट बनवला आहे. अधिक माहितीसाठी तो बघता येईल.) इथे मुद्दा हा आहे. की बडवानी शहरात जिथं आंदोलनावर FIR करण्यात आली आहे- राहणाऱ्या किती लोकांना जीवनशाळांबद्दल माहीत आहे? सरदार सरोवर धरणाचा प्रत्यक्ष परिणाम होणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये राहणाऱ्या भारताच्या किती नागरिकांना आपल्याच राज्यात दूरवर वसलेल्या ह्या बुडणाऱ्या गावांबद्दल, त्यांच्या अस्तित्वाबद्दल कल्पना आहे? किती मध्यमवर्गीय शहरी माणसांनी कुठल्याही आदिवासी बांधवांशी कधी संवाद केलाय ? मग कशाच्या भरोशावर हा शहरी मध्यमवर्ग ह्या आदिवासी समाजाबद्दल इतक्या खात्रीनं आपली मतं मांडतो ? नुसती मतं नाही तर ते पूर्णपणे judgemental असतात. जीवनशाळा कशा चालतात, त्या चालवणं किती कठीण आहे, यातून कसे विद्यार्थी तयार होतात हा इथे मांडण्याचा मुद्दाच नाही. हे ते कशाच्या भरोशावर बोलतात हा खरा प्रश्न आहे.

एकच प्रश्न पडतोय- नर्मदा नवनिर्माण अभियान वर जी FIR टाकण्यात आली आहे ती कशाच्या भरोशावर ? बडवानी, जिथं नर्मदा नवनिर्माण अभियान चं कार्यालय आहे, तिथल्या अभाविप च्या एका कार्यकर्त्यानं / भाजपा च्या पदाधिकाऱ्यानं संस्थेवर FIR टाकली आहे, ज्यात आरोप केला आहे की शाळांच्या नावानं पैसे गोळा करून ही संस्था ‘राष्ट्र विरोधी’ काम करते. नर्मदा नवनिर्माण अभियान विरुद्ध धारा ४२०, ४०६, १२० बी, १६० लावली आहे. ह्या आरोपाची चौकशी म्हणून, मध्य प्रदेश पोलीस, बडवानी, नंदुरबार, धुळे, मालेगाव, मुंबई आणि पुणे इथं येऊन सर्व विश्वस्तांच्या (सध्याचे १३) घरी जाऊन त्यांचे सविस्तर जवाब घेत आहेत. प्रत्येकी साधारण २ तास त्यांचे जवाब घेतलेत. जवाब देताना विडियो रेकॉर्डिंग पण करण्यात आली आहे. इतर गंभीर आरोप असणारे किंवा कधीकधी आरोप साबीत देखील झालेले लोक हा देश सोडून सहजपणे निघून जातात, किंवा इथेच कायद्याच्या नाकाखाली टिच्चून ऐश्वर्यात लोळत, आयुष्य जगत राहतात. पण दूरच्या खोऱ्यातल्या आदिवासी मुलांच्या शिक्षणाचं काम गेली ३० वर्ष करणारी एक संस्था हकनाक खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकते आणि अनेकांचा वेळ आणि शक्ती व्यर्थ होते. हे आरोप खोटे ठरणारच हयात काहीच शंका नाही. संस्थेचे व्यवहार पूर्णपणे चोख आहेत, ऑडिट केलेले आहेत, कुणीही बघू शकतं, संपूर्ण पारदर्शक आहे. येणाऱ्या प्रत्येक पैश्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला असता. देणगीदारांना रसीद दिलेली असते. मग हा आरोप त्यानी कुठल्या पुराव्यासह केला ? त्यानी नर्मदा नवनिर्माण अभियान चं कुठलं काम बघितलं आहे? ह्या बिन कामाच्या FIR चा पाया काय आहे? कशाच्या आधारावर हा आरोप केला गेलाय ? हे प्रश्न आरोप करणाऱ्याला विचारले जात नसून, नर्मदा नवनिर्माण अभियानच्या सर्व विश्वस्तांची चौकशी केली जात आहे. त्यात मध्य प्रदेश पोलीस अतिशय हिरीरीनं कामाला लागले आहेत. बलात्कार, खून, हुंडाबळी सारखे भीषण गुन्हे करणाऱ्यांवर पण FIR करायला काचकुच करणारे आपले सक्षम पोलीस ह्या बाबतीत मात्र तातडीनं कामाला लागतात. हे लोकशाहीसाठी खूपच गंभीर आहे.

तर आम्ही १५ ऑगस्ट साजरा करायला मणिबेलीला आहोत. प्रभात फेरी सुरू होते. स्वतंत्र भारताच्या अभिमानाचा तिरंगा घेऊन नर्मदेची ही लेकरं भारत माता की जय म्हणत गावाच्या टोका पर्यंत जातात. आम्ही पण त्यांच्या मागे असतो. गावाच्या अगदी शेवटाला दिसतं सरदार सरोवरचं पाणी ज्याच्या पोटात आता त्यांची आई नर्मदा लुप्त झाली आहे. अथांग पाणी, दूर बघितलं तर सरदार सरोवर धरण आणि त्याच्या समोर भारत मातेचा जयजयकार करणारी ही निष्पाप, निरागस, आदिवासी पोरं. प्रभात फेरी पूर्ण होते. शाळेच्या आवारात सुंदर रांगोळी काढलेली, फुलापानांनी सजावट केलेली. सगळे एक सुरात राष्ट्रगीत म्हणतो. मग एक एक विद्यार्थी समोर येतात आणि स्वातंत्र्य दिनाचं भाषण करतात.

– आपण भारत देशाचे नागरिक आहोत. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला, म्हणून तो आपण आज साजरा करत आहोत. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्याच्या विविधतेनं नटलेल्या…..

मला पुढे ऐकू येत नाही. समोर दिसणाऱ्या पाण्याएवढे अश्रू वाहताहेत असं जाणवतं. सोबत आलेले मित्र पण रडत असतात. आपण ज्या वर्गाचा भाग आहोत, ज्यांना आपण आपले म्हणतो तो शहरी मध्यमवर्ग इतका संकुचित मनाचा कधी झाला ? की ते आधीपासूनच तसे आहेत. पण तसं नसेल, कारण आंदोलनाला पाठिंबा देणारे, त्याला पुढे नेणारे देखील ह्याच मध्यमवर्गातून येतात. मग ते आता बदलले का? ज्यांना आपण कधी बघितलं नाही, जे आपल्या अध्यात-मध्यात कधीही येत नाहीत, आपल्याला काहीच मागत नाहीत त्यांचं काहीतरी अजून वाईट व्हावं असं आपल्या ह्या लोकांना का वाटत असेल ? ह्या लेकरा बाळांना दोन वेळचं जेवण मिळावं ह्यासाठी धडपडून मिळवून आणलेल्या तुटपुंज्या रकमेतून स्वतःसाठी काही काढून घ्यायचा विचार तरी कोणी करेल का? नर्मदा नवनिर्माण अभियान अंतर्गत चालणाऱ्या ह्या ७ जीवनशाळा, ह्यांना सुरू ठेवण्यासाठी त्याचे विश्वस्त, नर्मदेचे कार्यकर्ते, आंदोलनाचे समर्थक किती धडपड करतात हे ह्यांनी कधी बघितलं आहे का? ह्या लेकरांना अजून एक पौष्टिक पदार्थ कसा देता येईल ह्यावर तासनतास होणारी तगमग मी बघत असते. पी जी वूडहाऊस ह्यांना हिटलर च्या लोकांनी अटक केली होती. नंतर काही काळ त्यांचा छळ करून, त्यांना सोडण्यात आलं, तेव्हा ते बाहेर आल्यावर त्यांना एक प्रश्न विचारला गेला -की ज्यांनी तुमच्यावर इतके अन्याय केले, अत्याचार केले Do you hate themnow? वूडहाऊस उत्तरले – I don’t hate in plural. मी बहुवचनात द्वेष करत नाही !!!

फक्त माझं घर, माझी मुलं, त्यांचं शिक्षण, माझी सुट्टी, माझं पार्किग, ५ – १० रुपये वाचवण्यासाठी केलेला मोलभाव एवढंच माहीत असलेला मध्यमवर्ग, ज्यांना ह्यांनी कधी बघितलं नाही, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्या दूरवरच्या आदिवासींचा इतका द्वेष का करत असेल ? रोज चहा सोबत ‘बाहेरच्या जगात’ घडणाऱ्या बातम्या वाचत त्यावर बिनधास्त पणे आपली मतं मांडताना असणारा आत्मविश्वास हे ज्या असत्याच्या आधारावर मिळवतात ते शाश्वत नाही हे ह्यांना कधी लक्षात येईल? मेधा पाटकर नावाच्या एक बाई आहेत त्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी मुलांच्या शिक्षणाचं ‘राष्ट्र विरोधी’ काम करतात, त्यांना तुरुंगात टाकलं तर त्या आरोप कर्त्याला कुठला असूरी आनंद होईल ? फक्त राजकीय हेतूनं केले गेलेले काही व्यवहार काळाच्या न्यायालयात टिकत नाहीत हे इतिहासानं सतत दाखवून दिलंय. तिस्ता तलवाड, हिमांशू भाई ह्यांच्यावर केलेली दडपशाही बघून इतरही घाबरतील आणि धडा घेतील असा काहीसा त्यांचा विचार असावा. पण आंदोलन, त्याचे कार्यकर्ते, विश्वस्त हे ह्या सगळ्या दडपशाहीला वर्षानुवर्ष ओळखून आहेत…आपल्या मेधा पाटकर…. त्यांना बहुतेक अजून आरोप करणाऱ्यांनी ओळखलं नाहीये. म्हणूनच आपण न ओळखणाऱ्या, कधीही न बघितलेल्या, न समजलेल्या गोष्टींचा दुस्वास करण्याची मानसिकता ह्या आरोप करणाऱ्यांची आहे हे उघडच आहे.

सध्या व्यक्त होण्याचं, नवीन ज्ञान मिळवण्याचं, समविचारी लोकांशी मैत्री करण्याचं, प्रचार-प्रसार करण्याचं, विष पेरण्याचं, दंगे घडवण्याचं मुख्य हत्यार (औजार नव्हे, हत्यार) समाज माध्यमं आहेत. त्यातून ऐकून, वाचून जे समोर येतं त्यावर विचार न करता ते फॉरवर्ड करणारे आपल्या जवळपासचेच लोक आहेत. आधीच आपल्या ठराविक चौकटीतल्या अनुभवहीन माहितीला सत्य मानून आपल्या आत्म्यापेक्षा, नात्यांपेक्षा, नैतिकतेपेक्षा, सदसद्विवेकबुद्धीपेक्षा, देशबंधुतेपेक्षा, प्रेमापेक्षा ही समाज माध्यमं मोठी होऊन आपल्याला क्रूर, रागीट, विद्वेषी, सूडबुद्धीग्रस्त, संवेदनाहीन, भयग्रस्त, अविश्वासी आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याचा फक्त दुस्वास करणारं बनवतं आहे हे त्यांनी लवकरात लवकर लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना धमपिक्षा माणुसकीवर विश्वास आहे, समरसते पेक्षा समतेवर प्रेम आहे, द्वेषापेक्षा प्रेमावर श्रद्धा आहे आणि भारताच्या संविधानाबद्दल नितांत आपुलकी आहे त्यांनी ह्या बहुवचनात दुस्वास करणाऱ्यांशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यांना माहीत असलेली बाजूच फक्त सत्य आहे, बाकी सगळं नष्ट झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना दुसरी बाजू जाणून घेण्याची खूप गरज आहे, नाहीतर आपला हा समाज आणि हे जग फक्त दोन ध्रुवांवर हिंडकळत राहील.

आंदोलनाशी वर्षानुवर्ष जोडलेले नागरी साथी, सक्रीय सहभाग असणारे कार्यकर्ते, देणग्या देणारे मोठ्या दिलाचे मित्र, सोबत असलेले कलाकार, विचारवंत, लेखक, शिक्षक, आदिवासी समाजाला आपलं मानणारे शहरी नागरिक आपण ह्या लढ्यात एकत्र आहोत. ज्यांच्यावर आपलं अतोनात प्रेम आणि विश्वास आहे त्या आपल्या मेधाताईंना, आपल्या सगळ्यांच्या वतीनं सध्या एवढंच सांगू शकेन की मेधा ताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है. नर्मदा नवनिर्माण अभियान कुणन सेह ? आमरू सेह, आमरू सेह. आमू आखा, एक सेह. जिंदाबाद.

हे पण भारताचे लोक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top