जीवनशाळा: एक दृष्टिकोन – एक विचार

– कविता भागवत

जीवनशाला की क्या है बात, लड़ाई-पढ़ाई साथ साथ !! अशी घोषणा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमधून जेव्हा जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा तेव्हा समोर उभा राहतो तो तीन दशकांपासून सुरू असलेला एक संघर्षमय इतिहास.

नर्मदा काठापासून आठ ते सोळा किलोमीटर, कुठे कुठे तर पन्नास किलोमीटरपर्यंत एकही शाळा चालत नाही. ही जाणीव आदिवासी बांधवांना हळूहळू होऊ लागली. या जाणीवेतूनच आपली पुढची पिढी तरी साक्षर व्हावी असे लोकांना वाटू लागले. संस्कृती व रीतीभाती सांभाळून, निसर्ग आणि जीवन जपणाऱ्यांनाही हवे होते शिक्षण – समाजाशी जोडणारे!

गावकऱ्यांनी शाळा उभारण्याचे मनावर घेतले. सारे कसब आदिवासींचे आणि शाळेतील विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी कंबर कसली कार्यकर्त्यांनी. मग साकारले स्वप्न पहिल्या ‘जीवनशाळेचे’….१९९२ साली अक्कलकुवा तालुक्यात चिमलखेडी गावी सुरू झाली पहिली जीवनशाळा. शिक्षणाची आणि त्यामार्फत होणाऱ्या विकासाची एक मुहूर्तमेढच रचली गेली. शाळा केवळ सुरू करून चालणार नव्हते तर ती चालावी कशी याबाबतच्या आराखड्याचाही सखोल विचार करणे गरजेचे होते. आदिवासींचे जीवन हे जल, जंगल, जमिनीवर आधारलेले. अशा परिसरात शिक्षण हे या सारख्या संसाधनांवर जगावे कसे, आयुष्यातील गरजा पुरविताना ते वापरायचे कसे आणि टिकवायचे तरी कसे, यासाठीच आवश्यक. केवळ औपचारिक शिक्षण म्हणजे या साऱ्या संदर्भापलीकडले; म्हणूनच शिक्षण हे भाषा, माध्यमे, अभिव्यक्तीपासून ते अवतीभोवतीचे जग, निसर्ग, आदिवासींचा इतिहास, संस्कृती सारे समजून उमजून देणारे हवे. सरकारी अभ्यासक्रम पूर्णपणे न नाकारता, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातील समन्वय साधला जायला हवा. या सर्व मूलभूत विचारांसह जीवनशाळेचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी गावागावातून निवडलेल्या प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, मार्गदर्शक म्हणून लाभले. आणि हळूहळू आकार घेत गेला ‘जीवनशाळा’ हा एक विचार, दृष्टिकोन…..

आजमितीला महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात ६ तर मध्यप्रदेश येथे १ अशा एकूण ७ जीवनशाळा ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ मार्फत चालविल्या जातात. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ३ गावांमध्ये भाबरी, थुवाणी, सवऱ्यादिगर तर अक्कलकुवा तालुक्यात २ गावांमध्ये डनेल, मणिबेली, शहादा तालुक्यात एका गावामध्ये – जावदेवाडी पुनर्वसन वसाहत, आणि मध्यप्रदेशातील एका गावामध्ये – खाऱ्याभादल अशा या ७ जीवनशाळा चालतात. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडील आणि नकाशातही सापडायला कठीण असलेल्या अशा अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये चालणाऱ्या या ७ शाळांमध्ये आज ७०० ते ८०० आदिवासी मुलेमुली शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या या निवासी शाळा आहेत. या शाळा चालविणे, हे नक्कीच सोपे काम नाही. अनंत अडचणींना तोंड देऊन मोठ्या कष्टाने या शाळा चालविल्या जातात.

कोविड काळात संपूर्ण शिक्षण ठप्प झालेले असताना आदिवासी मुलांसाठी जीवनशाळेच्या शिक्षकांनीच नव्हे, तर पुनर्वसन वसाहतीतील तरुणांनीही अतिशय सक्षमपणे ज्ञानदानाचे काम अविरत चालू ठेवले होते.

काय बरं असं वेगळं आहे या शाळांमध्ये? केवळ पुस्तकी शिक्षण देणे व मुलांना साक्षर बनविणे हा संकुचित दृष्टिकोन सुरुवातीपासूनच नसल्याने, मुलांपर्यंत प्रत्यक्ष जीवन जगताना उपयोगी ठरणाऱ्या अनेक बाजू पोहोचविण्याचा प्रयत्न कष्टाने केला जातो. पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच आदिवासींची समृद्ध संस्कृती व इतिहास, जल-जंगल-जमीन व नर्मदेविषयी असलेले प्रेम आणि अतूट नाते, शेती, जंगलातील जडीबुटी व त्यांचा वापर, हस्तउदयोग व हस्तकला, स्वावलंबन, स्वतःची भाषा, स्वतःचे हक्क मिळविण्यासाठी आत्तापर्यंत झालेला तीव्र संघर्ष या व अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश रोजच्या दिनक्रमात सहजपणे केला जातो, म्हणूनच ही आदिवासी मुले स्वतःच्या जीवनाशी, जगण्याशी जोडलेली राहतात. शिक्षण घेऊन जीवनोपयोगी कामांना, कलांना, स्वतःच्या संस्कृतीला, भाषेला कमी न लेखण्याचा वसा देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सातत्याने केला जातो. सर्वसाधारणपणे पाठ्यपुस्तकातील विषयांच्या जोडीला शालेय शेती, स्वयंपाकात मदत, हाताने बनविण्याच्या वस्तू शिकणे, जल-जंगल-जमीन- जनावरे – जडीबुटी गाव यांबाबतचे शिक्षण, आंदोलनाचा इतिहास-भूमिका जाणून घेणे या ५ महत्त्वपूर्ण विषयांचे उपक्रम दैनंदिन नियोजनात आखले जातील, असा प्रयत्न केला जातो.

या उपक्रमांद्वारे भाषा, गणित, परिसर, विज्ञान, सामाजिक भान इत्यादी अनेक विषयांशी जोडून घेत घेत 1 कृती करण्याचा आनंद मुलांना मिळू शकतो म्हणूनच आज जेव्हा या शाळांमधील मुले जोशात संघर्षाची गीते आदिवासी मराठी व हिंदी भाषांमधून त्यांच्या खड्या आवाजात गातात तेव्हा अंगावर काटा उभा राहतो.

शालेय शिक्षणाबरोबरच मोर्चे यांमध्ये हिरिरीने सहभागी होणे, शिक्षक व गावाबरोबर स्वतःच्या शाळेची आदिवासी पद्धतीने बांधणी किंवा उभारणी करणे, शाळेतील स्वयंपाकासाठी लाकूडफाटा गोळा करणे, स्वयंपाक करणाऱ्या मावशींना पाणी भरण्यापासून ते रोजचा शिधा मोजून देण्यापर्यंत आणि आळीपाळीने सगळ्या मुलांना जेवायला वाढण्यापर्यंत मदत करणे, जीपमधून तर काही ठिकाणी नावेतून वाहून आणलेले शाळेचे धान्य शिक्षकांना शाळेपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करण्यापासून ते धान्य निवडून साठवणूक करण्यापर्यंत मदत करणे, स्वतः साठी दातवण (दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या) गोळा करायला जाण्यापासून ते स्वतःचे कपडे स्वतः धुण्यापर्यंतची सर्व कामे ही मुले अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि एकमेकांच्या सहकार्याने लीलया पार पाडतात. हे सर्व करणारी ही मुले ७ ते ११ वर्षांची आहेत, यावर प्रत्यक्ष पाहूनही विश्वास ठेवणे कठीण जाते. मुळातच काटक असलेली ही आदिवासी मुले कबड्डी, खो-खो तसेच पोहणे, नाव चालविणे यात स्वतःच्या नैपुण्याची झलक दाखवितात. कोणत्याही प्रकारचे विशेष प्रशिक्षण नसताना, खेळाची वेगळी अशी साधनसामग्री उपलब्ध नसताना, केवळ स्थानिक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे खेळातील प्रावीण्य आश्चर्यचकित करून जाते. आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली गाणी, नृत्य तसेच वादय वाजविण्याच्या कौशल्यातही ही मुले आघाडीवर असतात.

शाळेत काही विशेष उपक्रमही दरवर्षी साजरे होतात. सण, राष्ट्रीय दिन, नेते समाजसुधारक यांची जयंती, आंदोलनातील शहीद व्यक्तींची पुण्यतिथी यांबरोबरच सगळ्यांचा आवडता ‘बालमेळा’ हा विशेष महत्त्वाचा असतो. मुले, शिक्षक, कार्यकर्ते, पालक, गावकरी, महाराष्ट्रातील सगळी समर्थक मंडळी या बालमेळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.

सर्व शाळांचा एकत्र होणारा हा अविस्मरणीय सोहळा वर्षभर नवी ऊर्जा, प्रेरणा देऊन जातो. त्या निमित्ताने मुले आपला परिवेश सोडून दूरच्या ठिकाणी प्रवास करू शकतात. जीवनशाळेतील इतर मुलांना भेटू शकतात. आपले कौशल्य इतरांसमोर दाखवू शकतात. अनेक अर्थानी हा ‘बालमेळा’ महत्त्वपूर्ण ठरतो. बहुतेक करून पुनर्वसन वसाहतीत हा बालमेळा संपन्न होत असल्याने, आपल्याच शाळांसाठी अतिशय प्रेमाने, आपुलकीने आणि तितक्याच कष्टाने संपूर्ण वसाहत याचे आयोजन व नियोजन करते. वसाहतीतील प्रत्येक घर बालमेळ्यासाठी सज्ज असते. ९०० ते १००० माणसांची निवासाची, खाण्यापिण्याची, स्पर्धांची एक ना अनेक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडल्या जातात. एकतेचे, आपल्याकडील तुटपुंज्या सोयीसुविधांच्या आधारे मुलांचे, मोठ्यांचे व पाहुण्यांचेही उत्साहाने स्वागत करण्याच्या वृत्तीचे इतके मोठे उदाहरण खचितच इतर कोठे पहायला मिळेल. बालमेळ्यात प्रामुख्याने मैदानी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. मुलांच्या व मुलींच्या शाळाशाळांच्या टीममध्ये होणाऱ्या खो-खो व कबड्डीच्या स्पर्धा चुरशीचा विषय ठरतात. खेळतानाचे मुला-मुलींचे कसब, काटकता, चपळाई, विदयुतवेगाने होणाऱ्या सफाईदार शारीरिक हालचाली, संघ-गट भावना, हार-जीत आनंदाने व कोणत्याही कुरबुरीशिवाय स्वीकारण्याची वृत्ती हे आपल्यासारख्या शहरी लोकांना खूप काही शिकवून जाते. संध्याकाळी रंगणारा शाळाशाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम ३ दिवस बालमेळ्यात रंगत भरतो. समूहगीते, नृत्य, नाटक या माध्यमांतून केवळ मुलांचेच नव्हे, तर शिक्षकांचेही विशेष गुण ठळकपणे समोर येतात. आदिवासी संस्कृती, संघर्ष, पर्यावरण, शिक्षण, रोजगार, प्रदूषण अशा एक ना अनेक विषयांवर शिक्षक स्वतः त्यांच्या भाषेत गाणी, नाटके लिहितात. नृत्य बसवितात आणि या सगळ्यांसाठी लागणारी ड्रेपरीही उपलब्ध स्थानिक साधनसामग्रीतून बनवितात. हे सगळे पाहिल्यावर कोण म्हणेल इथे कल्पकता, नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता नाही म्हणून…… केवळ पाहणाऱ्यांची दृष्टी व्यापक आणि सामाजिक-भौगोलिक संदर्भ जाणून घेणारी हवी, नाही का! या सगळ्या धामधुमीत मुलांसाठी व शिक्षकांसाठी वैयक्तिक स्पर्धाही असतात. चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लांब उडी, धावण्याची स्पर्धा, लहान मुलांसाठी पोत्यातील उड्या, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धांचे दरवर्षी कल्पकतेने व नावीन्यपूर्णतेने नियोजन केले जाते. दरवर्षी होणारा हा एक मोठा सोहळाच असतो म्हणा ना! आणि या सोहळ्याची सांगता होते छानशा बक्षीस समारंभाने. खेळात जिंकलेल्या सर्व संघांना / गटांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगाच्या वस्तू विचारपूर्वक दिल्या जातात. कपाटे, खुर्च्या, टेबल, सतरंज्या, शाळेला लागणारी वादये अशा वस्तूंची जाणीवपूर्वक बक्षीस म्हणून निवड करणे, यात कार्यकर्त्यांची सजगता नाही का? असलेल्या साधन संसाधनांचा उत्तम वापर करून आर्थिक गणिताची घडी घालतच शाळेच्या गरजा पूर्ण करण्याचे अवघड कसब या कार्यकत्यांनी निश्चितच आत्मसात केले आहे, यात शंका नाही.

मुलांप्रमाणेच जीवनशाळेचे शिक्षक हे देखील या संपूर्ण संरचनेचा एक महत्त्वाचा घटक आहेत. ज्या सामाजिक-सांस्कृतिक भौगोलिक वातावरणातील ही मुले आहेत, त्याच भागातील हे सर्व शिक्षक असल्याने अनेक सकारात्मक गोष्टी सहजतेने साध्य होताना दिसतात. इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसाधारणपणे दिसून येणारी भाषेची आणि आदिवासी-बिगर आदिवासी अशी दरी इथे जाणवतच नाही. शिक्षक मुलांच्या सवयी, आवडीनिवडी, भाषा, जीवन जगण्याची पद्धती यांच्याशी पूर्णपणे परिचित आहेत. त्यामुळेच मुलांना इथे आपलेपणा वाटतो. येथील शिक्षक एक नोकरी म्हणून याकडे न बघता या संपूर्ण प्रक्रियेत अतिशय समरसून सहभागी झालेले दिसतात. निवासी शाळा असल्यामुळे आपल्या स्वतःच्या कुटुंबाशिवाय, शाळेला व मुलांनाच आपले कुंटुंब मानून अतिशय प्रेमाने प्रत्येक शाळेतील हे ४ शिक्षक शाळेचा सर्व कारभार समर्थपणे पेलतात म्हणूनच मुलांचे वाढलेले केस कापण्यापर्यंत सर्व कामांत हे शिक्षक माहीर आहेत, यात आश्चर्य ते काय! हेच जगण्यातील स्वावलंबन नाही का? आणि इतके सर्व असूनही कोणतेही सरकारी अनुदान नसल्याने हे शिक्षक, मावशी व कामाठी अतिशय अल्प मानधनावर हसतमुखाने काम करतात. आपल्या शिक्षकांना चांगल्यात चांगले ट्रेनिंग मिळावे, मुलांना शक्य तितक्या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात, निर्माणाच्या कामासाठी आर्थिक ओघ सतत चालू राहावा यासाठी हे कार्यकर्ते जिवाचे रान करतात. कल्पनेपलीकडील दुर्गम भागात, कोणत्याही सोयीसुविधांचे नामोनिशाण नसताना, अहोरात्र एकच ध्यास घेऊन हे कार्यकर्ते उदयाच्या चांगल्या भविष्याची स्वप्ने बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत झटत राहतात. सर्व ऋतूंत, कोणत्याही परिस्थितीत शाळेला धान्य वेळेवर पोहोचविणे, मुलांच्या बालमेळ्याचे आयोजन करणे, पावसाळ्यात झालेली शाळेची दूरवस्था गावकरी, शिक्षक यांच्या मदतीने पुन्हा पूर्ववत करणे, चौथी नंतर शाळेतील मुलांच्या इतर ठिकाणी अॅडमिशन करून देणे, खेळात प्रावीण्य असलेल्या मुलांना महाराष्ट्र राज्य क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळावा म्हणून झटणे, दुर्गम भागात राहूनही बाहेरच्या जगाशी शक्य तितक्या संपर्कात राहणे, समर्थकांना शक्य तितकी आजच्या चालू कामाची माहिती देणे, आदोलनाची प्रदीर्घ चालणारी किचकट कामे या आणि अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी नाही हा शब्दच जणू त्यांना माहीत नाही. जीवन शाळा भविष्यातही गुणवत्तापूर्ण रीतीने चालाव्यात आणि विकास हा काही लोकांचा हक्क न राहता तळागाळातील दुर्लक्षिलेल्या आपल्याच बांधवांपर्यंत पोहोचावा हाच यांचा ध्यास आणि हाच यांचा अट्टहास… आजच्या या व्यक्तिकेंद्रित समाजात अशीही माणसे आहेत, हे विशेषच म्हणावे लागेल.

इतके सगळे आहे, तर मग काहीच अडचणी, प्रश्न नाहीत का? तर असे अजिबातच नाही. अनंत अडचणी आणि प्रश्न आहेतच; ते सोडवत सोडवतच पुढे जायचे आहे, याची पूर्ण जाणीव काम करणाऱ्या प्रत्येकालाच आहे म्हणूनच मार्ग निघण्याची शक्यताही अधिक आहे ना! आपण आधुनिक जगात, तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असलो तरी आपल्याच देशात, आपल्याच राज्यात आजही अशी गावे आहेत, की जिथे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा नसल्याने अनेक गोष्टी करण्याचा मानस असूनही त्याची गती कासवापेक्षाही मंद आहे. आजही शिक्षकांना, कार्यकर्त्यांना मूळ गावात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आजही अनेक घरात ४/५ मुलांपैकी एखादा मुलगा किंवा मुलगी घर, गुरेढोरे सांभाळण्यासाठी शिक्षणापासून दूर ठेवली जातात. आजही साप चावून, पाण्यात बुडून मृत्यू होऊ नयेत म्हणून धडपडावे लागते. लहान-मोठ्या सगळ्यांनाच व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सतत सांगावे लागते. विविध कला कौशल्ये, हाताने करण्याच्या कामांबरोबरच लेखन वाचन कौशल्येही पारंपरिक पद्धतीने न शिकविता वेगळ्या प्रकारे शिकविता येते याबाबत सतत सांगत राहणे, या पद्धती इथल्या शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, या पद्धतींचा सतत अवलंब होत राहील यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षकांना प्रत्यक्ष मुलांबरोबर काम करताना आवश्यक तेथे मदत-मार्गदर्शन मिळणे, शिक्षकांचे स्वतःचे अनुभव विश्व व्यापक बनावे आणि मुलांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी समजून-उमजून प्रयत्न करणारे सजग मनुष्यबळ निमार्ण होणे, रोजच्या कष्टप्रद जगण्याला तोंड देताना आणि दैनंदिन कामकाजाचा व्याप सांभाळताना सर्जनशील शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया मागे पडू नये, यासाठी मधूनमधून शिक्षकांना योग्य प्रकारे मदत मार्गदर्शन, प्रेरणा प्रोत्साहन मिळेल अशी व्यक्तींची टीम उपलब्ध होणे, हा सगळा डोलारा आहे त्यापेक्षा नेहमीच अधिक चांगला चालावा यासाठी आर्थिक मदतीचा ओघ निर्माण होत राहणे, योग्य ते मनुष्यबळ सतत उपलब्ध होत राहणे….. अशा एक ना अनेक गरजा सतत असणारच आहेत आणि यासाठी समाज म्हणून नक्कीच आपली प्रत्येकाची काही ना काही नैतिक जबाबदारी आहे, नाही का !

आजच्या आधुनिक जगात मानवी मूल्यांची डोळ्यांदेखत घसरण होत असताना, आदिवासी समाजाचे प्रतिबिंब असणाऱ्या या ‘जीवनशाळा’ टिकल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. आधुनिक शिक्षणाबरोबरच आदिवासी समाजाची उच्च दर्जाची मानवी मूल्यव्यवस्था टिकावी म्हणून, आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, परंपरांचा आदर – अभिमान वाटावा म्हणून, स्वतःच्या संस्कृती परंपरेतील चांगल्या गोष्टी तशाच पुढे टिकाव्यात आणि हानिकारक गोष्टी समजून-उमजून सोडून देता याव्यात, बदलता याव्यात म्हणून, आपल्या जल जंगल-जमीन-कलांशी पुढील पिढ्यांची नाळ जुळलेली रहावी म्हणून, समाजासाठी, देशासाठी मुलांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी व विश्वास टिकून रहावा म्हणून… प्राथमिक, मूलभूत व सुरुवातीच्या जडणघडण काळातील महत्त्वाचे शिक्षण देणाऱ्या या ‘जीवनशाळा’ आहेत आणि असतील… निरंतर… अबाधित!

Scroll to top