हिन्दी में पढिएँ | Read in English
नर्मदा नवनिर्माण अभियानचे कार्य
नर्मदेच्या खोऱ्यात स्थानिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षासह अनेक रचनात्मक कामांची पायाभरणीही ट्रस्टमार्फत झालेली आहे. ट्रस्टच्या आजवरच्या कामांची थोडक्यात ओळख:
पुनर्वसन : आजवरच्या आमच्या अहिंसक संघर्षातून आणि न्यायालयीन लढयातून महाराष्ट्रातील सुमारे ३५०० विस्थापित कुटुंबांना शेतजमीन, प्लॉटस मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमधील १६००० कुटुंबांचं पुनर्वसन झालं आहे. महाराष्ट्रातील १४ आणि मध्य प्रदेशातील ८३ पुनर्वसन वसाहतींच्या बांधकामात अभियानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जमीन आणि जंगलावरील हक्क : पिढ्यानपिढ्या जी जमीन कसत आले त्या जमिनीवर आपला हक्क मिळवण्यासाठी नंदुरबार (महाराष्ट्र) येथील हजारो आदिवासींबरोबर नर्मदा नवनिर्माण अभियान खंबीरपणे उभं राहिलं आहे. २००६ च्या वन अधिकार कायद्यानुसार सुमारे ११० आदिवासी गावांतील कार्यकत्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यापैकी किमान २५ गावांनी त्यांच्या गावच्या सीमेत येणाऱ्या जल, जंगल आणि जमिनीवर त्यांचा हक प्रस्थापित केला आहे. हजारोंच्या संख्येने व्यक्तिगत वनहक्कदेखील मिळवले गेले आहेत.
मासेमारीचे हक्क : नर्मदा नवनिर्माण अभियानाने मध्य प्रदेशातील १० आणि महाराष्ट्रातील ३२ फिशिंग को ऑपरेटिव्हजची स्थापना करण्यात मदत केली आहे. यातून सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बोटी, जाळी पुरवण्यासाठी आणि लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी अभियानाने महाराष्ट्र शासनावर पाठपुरावा केला होता. फिशिंग को-ऑपरेटिव्हजचं काम समाधानकारकपणे चालू आहे.
रोजगार : जाणीवजागृती, आदिवासी संघटन, सोशल ऑडिट पार पाडणे आणि भ्रष्टाचाराचा मुकाबला अशा विविध आषाड्यांवर नर्मदा नवनिर्माण अभियान कार्यरत आहे. २०२० सालच्या टाळेबंदीमध्ये शहरांमधून खेड्यांकडे परतणाऱ्या मजुरांना आपल्याच परिसरात काम मिळवून देण्यासाठी अभियानाने प्रयत्न केले. सर्वकष ग्रामीण विकास साधण्यासाठी पाणी व्यवस्थापन, खासगी शेती आणि इतर संबंधित कामांमध्ये रोजगारनिर्मिती करून येथून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता जंगलउत्पादनांची विक्री, त्यांचे टिकाऊ पदार्थात रूपांतर करून विक्री, अशा माध्यमांतून रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडत आहे.
आरोग्य : नर्मदा खोऱ्यातील सुमारे ५० खेड्यांमधील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर नर्मदा नवनिर्माण अभियान काम करत आहे. येथील आरोग्य सुविधा. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्याशी जोडून घेऊन त्यांच्या कामाचं मूल्यमापनही अभियान करत आहे. महाराष्ट्राच्या राज्य आणि जिल्हा स्तरीय गाभा समितीवर नर्मदा नवनिर्माण अभियान नंदुरबार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतं.
शिक्षण : सध्या नर्मदेच्या खोऱ्यातील आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ९’जीवनशाळा’या दुर्गम भागात मागील २७ वर्षे सुरू आहेत. त्यापैकी ७ जीवनशाळा महाराष्ट्रात आणि २ जीवनशाळा मध्य प्रदेशात आहेत. मन-मनगट-मेंदूचा विकास करणाऱ्या जीवनाभिमुख शिक्षणाचा हा प्रयोग आहे. या जीवनशाळांमधून सध्या महाराष्ट्रात ७८० आणि मध्य प्रदेशात १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शोभा वाघ स्मृती छात्रालयामध्ये सध्या ३० मुलांची सोय केली गेली आहे. जीवनशाळांतून आजवर शेकडो क्रिडापटू, पदवीधर, द्वीपदवीधर तयार झाले आहेत जे आपले जीवन अधिक समृद्ध करत असतानाच आपल्या गावांच्या विकासालाही हातभार लावत आहेत. लॉकडाऊनच्या काळात गावांनी गावांसाठी सुरू केलेल्या ‘निर्माणशाळा’ हा शिक्षण आणि स्वावलंबी ग्रामविकासाचा एक अनोखा प्रयोग आहे.
अन्न अधिकार : नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या प्रयत्नांमुळे या दुर्गम भागातील हजारो कुटुंबांना रेशन कार्डस मिळाली आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनेक त्रुटी दूर करण्यात अभियानाने मोलाचा हातभार लावला आहे.
मदत कार्य : देशभरात उद्भवणाऱ्या पूर, आग, भूकंप, त्सुनामी, टाळेबंदी यासारख्या विविध संकटांमध्ये अभियानाने कायम आपला मदतीचा हात दिला आहे.
इतर अहिंसक लढ्यांना सहकार्य : उपजीविका, सामाजिक न्याय, लैंगिक न्याय, शहरी गरिबांना घरं मिळवून देण्याची लढाई, दलित आणि आदिवासी हक्क अशा विविध मुद्द्यांवर काम करणाऱ्या संघटनांना नर्मदा नवनिर्माण अभियान सातत्याने मदत करते.
नर्मदा नवनिर्माण अभियान भविष्याची दिशा
‘लोकसहभागातून लोकशाही’ या पायाभूत तत्त्वाच्या आधाराने नर्मदेच्या खोऱ्यातील ३४ वर्षांचा संघर्ष आकारास आला आहे. बरंच काही साध्य झालं आहे आणि बरंच काही साध्य करायचं आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान भविष्यात खालील मुद्द्यांवर काम करू इच्छिते –
- पुनर्वसन वसाहतीतील लोकांना आणि नर्मदेच्या तीरावरील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी-सुविधा आणि वन अधिकार मिळवून देणे.
- उरलेल्या आदिवासी कुटुंबांना कबूल केली गेलेली शेतजमीन किंवा प्लॉट मिळवून देण्यासाठी मदत करून त्यांचं न्यायपूर्ण पुनर्वसन करणे.
- आदिवासींना सेंद्रिय शेती, समूह शेती, शेततळी, वनीकरण याबाबत प्रशिक्षण देणे.
- जीवनशाळांच्या सहयोगाने प्रौढ साक्षरता आणि लघुउद्योग विकास यांना चालना देणे.
- युवकांमध्ये जाणीवजागृती करून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे आणि पर्यायी विकासाला चालना देणे.